स्वराज्य वार्ता / छत्रपती संभाजीनगर
बाली (इंडोनेशिया) येथील जागतिक साहित्य संमेलनात होणार सन्मान
मुख्य अतिथी म्हणूनही निमंत्रण
————————————
विख्यात कवी, समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर तर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे.
इंडोनेशियातील बाली येथे येत्या १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या संमेलनासाठी त्यांना ‘मुख्य अतिथी’ म्हणूनही निमंत्रित करण्यात आले आहे. या दुहेरी बहुमानाबद्दल साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून डी. बी. जगत्पुरिया यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी हा सन्मान अत्यंत नम्रपणे आपले आप्तस्वकीय, मित्र परिवार आणि चाहत्यांना अर्पण केला आहे.
डी. बी. जगत्पुरिया यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या नावावर मराठी व हिंदी कवितासंग्रह, ५ समीक्षा ग्रंथ, सामाजिक-वैचारिक ग्रंथ, व्यक्तिचित्रे, नाटक आणि एकांकिका अशी सुमारे ३० ते ३२ पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय,३५वे अस्मितादर्श साहित्य संमेलन, अंकुर साहित्य संमेलन आणि इतर अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
कथा, कविता आणि सामाजिक लेखन करणाऱ्या तब्बल ७० हून अधिक लेखकांच्या पुस्तकांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय आणि ७ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी पत्र पाठवून जगत्पुरिया यांचे वशेष अभिनंदन केले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






