स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके
आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ग्रामपंचायत कार्यालय आष्टीच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या सुसज्ज आणि आधुनिक ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेचा’ भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय परिसर, आष्टी येथे पार पडणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य वातावरण आणि शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत, या उदात्त हेतूने या अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा विद्यमान आमदार मा. श्री. बबनरावजी लोणीकर साहेबयांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती परतूरचे सभापती श्री. राहुलजी लोणीकर लाभणार आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जालना जिल्ह्यासह परतूर तालुक्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंह संधू , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष बनसोडे, प्रकल्प संचालक श्री. सुनिल पठारे, उपविभागीय अधिकारी श्री. पद्ममाकर गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र तुबाकले, तहसीलदार श्री. दामोदर जाधवआणि गटविकास अधिकारी श्री. कौशल पाटील या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.

या सुसज्ज अभ्यासिकेमुळे आष्टी येथील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक आदर्श आणि शांत जागा उपलब्ध होणार असून, यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना नवीन दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्यास आष्टी परिसरातील सर्व नागरिक, शिक्षणप्रेमी, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमती शोभा चंद्रकात मोरे (सरपंच, ग्रामपंचायत आष्टी), श्री. नसरूल्लाहखान काकड (उपसरपंच, ग्रामपंचायत आष्टी), श्री. डी. बी. काळे (ग्रामपंचायत अधिकारी, ग्रा.पं. आष्टी) तसेच समस्त सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आष्टी यांनी केले आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






