स्वराज्य वार्ता / राम राठोड,
१४ ते १५ वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण; जनजागृतीसाठी ग्रामस्तरावर मोहीम राबविण्याचे आवाहन
आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेबाबत आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांची मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ही लस देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या घातक आजारांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असल्याने या लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन पालकांना व नागरिकांना लसीकरणाबाबत जागरूक करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले.
जिल्हा परिषद जालना यांच्या वतीनेही या मोहिमेबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत विश्वास निर्माण करून पात्र मुलींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे.
आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या बैठकीत डॉ. डाके, डॉ. पांढरपोटे, श्री. काळे, श्री. पुजरवाड, श्री. देशमुख, श्री. फपाळ, बळीराम खरात श्रीमती वळसे, मोरे मॅडम, जाधव मॅडम तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.
यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना गावोगावी जाऊन पालकांशी संवाद साधून एचपीव्ही लसीचे महत्त्व समजावून सांगण्याचे व पात्र मुलींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. या मोहिमेमुळे भविष्यातील गंभीर आजारांपासून मुलींना संरक्षण मिळणार असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






