स्वराज्य वार्ता / राम राठोड
वाशिमच्या वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराजांचे नाव
परतूर प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम यास “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे नामकरण करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याने बंजारा समाजात आनंदाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राष्ट्रीय बंजारा परिषदच्या वतीने परिषदेचे पदाधिकारी कैलास चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत.
कैलास चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत असून त्यांनी समाजात समता, स्वाभिमान, नैतिकता व सामाजिक जागृतीचे विचार रुजवले. त्यांच्या नावाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण होणे ही संपूर्ण बंजारा समाजासाठी अभिमानाची बाब आहे.”
या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यासह आजूबाजूच्या ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणासोबतच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून संत सेवालाल महाराजांच्या विचारांना शासकीय स्तरावर सन्मान मिळाल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या भावनांचा आदर ठेवत घेतलेला हा निर्णय दूरदृष्टीपूर्ण असून, यामुळे सामाजिक सलोखा व समतेचा संदेश अधिक बळकट होईल, असेही कैलास चव्हाण यांनी नमूद केले. बंजारा समाजाच्या वतीने त्यांनी राज्य शासनाचे व विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






