स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य
आष्टी : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडारवाडी येथे वीस दिवसापूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.२७ ऑक्टोंबर २०२५ रोजी आष्टी पोलीस ठाणे हद्दीत वडारवाडी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. त्यासंदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात फिर्यादी गंगाधर चौगुले यांचे फिर्यादीवरून आरोपी अशोक तीपन्ना चौगुले याचेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी मारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी अशोक चौगुले हा फोन बंद करून फरार झाला होता. त्याअनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी एक पथक तयार करून आरोपी नामे अशोक तीपन्ना चौगुले याच्या शोधकामी तांत्रिक विश्लेष्णा आधारे तपासचक्रे फिरवत गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक तीपन्ना चौगुले राहणार कुप्पा तालुका वडवणी जिल्हा बीड यास निडागुंडी राज्य कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे. यानंतर सदर आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी रेंगे साहेब मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलीस अंमलदार राणा पांढरे, अविनाश चव्हाण यांच्या पथकाणे केली आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







