स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना संदर्भात दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर येथे जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व मुख्याध्यापक व शाळा प्रमुख यांची बैठक गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. सदर बैठकीला ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर भोंबे, उपप्राचार्य पांडुरंग निळे, गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तज्ञ डॉ दुर्गादास कान्हडकर, ॲड. प्रांजली पाचलेगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी केशव घुगे, केंद्रप्रमुख मारोती घुगे, तुकाराम साबळे, दिलीप साबळे, संजय स्वामी हे उपस्थित होते.
शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा ही महत्त्वाची असल्याने महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 नुसार विविध उपाय योजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने शाळा स्तरावर कोणकोणती उपाययोजना करणे अपेक्षित आहे या संदर्भात शासन निर्णयाच्या आधारे सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. हर घर तिरंगा अभियान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीच्या निमित्ताने 14 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळेमध्ये पसायदान म्हणणे, 15 ऑगस्ट रोजी सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये कवायत संचलन घेणे, स्काऊट गाईड नोंदणी करणे, विविध प्रलंबित प्रशासकीय कामे पूर्ण करणे, ऑनलाइन कामे पूर्ण करणे, शालेय विविध समित्या गठित करून, समित्यांची बैठक घेणे इतिवृत्त ठेवणे, शालेय पोषण आहार योजना चांगल्या पद्धतीने राबविणे यासारख्या विविध विषयावर सुलभक मयूर जोशी यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. दुर्गादास कान्हडकर यांनी विद्यार्थी यांच्या शारीरिक विकासासोबत मानसिक, भावनिक व सामाजिक विकासाकडे गांभीर्याने लक्ष देणे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे नमूद केले. विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भाने असणाऱ्या कायदेविषयक तरतुदी विषयी ॲड प्रांजली पाचलेगावकर यांनी माहिती दिली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व प्रत्येक विद्यार्थ्यांचा पंचकोश विकास करण्याचे ध्येय शिक्षण विभागाने ठरविले आहे. यादृष्टीने काम केल्यास विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व समस्या दूर होतील अशी आशा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी व्यक्त केली. प्राचार्य श्रीधर भोंबे यांनी मार्गदर्शन करताना चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या शिक्षकांचा मुख्याध्यापकांचा गुणगौरव होणे आवश्यक आहे. त्यांच्या चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे असे नमूद केले.
सदर बैठकीचे सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन उच्च श्रेणी मुख्याध्यापक शंकर दांडगे यांनी केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






