स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
परभणी जिल्ह्यातील काही कृषी परवाना धारक विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना शासननिर्धारित दरांपेक्षा अधिक दराने युरिया खत विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या परभणी जिल्हाध्यक्षा रेखा बाबुराव मनरे यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे दिनांक 31/07/2025 रोजी लेखी तक्रार सादर केली आहे.
या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील काही दुकानदार शेतकऱ्यांकडून प्रत पोती ₹५० पर्यंत अधिक दर आकारत आहेत. शासनाने युरिया खतासाठी ठरवलेले दर स्पष्ट असतानाही, खरिप हंगाम सुरू असताना खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
रेखा मनरे यांनी आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
युरिया खत चढ्या दराने विकणाऱ्या विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.
अशा विक्रेत्यांचे कृषी परवाने रद्द करण्यात यावेत.
शेतकऱ्यांना योग्य दरात आणि पुरेशा प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे.
दोषींवर कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 1985 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.
या प्रकरणाची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी व योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलण्यात येतील, असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दिला आहे.
रेखा मनरे (महिला जिल्हाध्यक्षा, परभणी) यांची स्वाक्षरी असून, कृषी परवाना धारक विक्रेत्यांविरोधात ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






