स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी नगर परिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात पाथरी शहरातील हजारो नागरिकांनी आज लोकशाही मार्गाने धडक मोर्चा काढला. मा. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा चौक बाजार पाथरी येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. पाथरी नगर परिषदेच्या बेजबाबदार, जनविरोधी व भ्रष्ट कारभाराविरोधात रोष व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला.
या मोर्चामागील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
१) पिण्याच्या पाण्याची टंचाई: पाथरी नगर परिषदेकडून दर दोन दिवसांनी पाणीपुरवठा अपेक्षित असताना १०-१० दिवस पाणी बंद ठेवले जाते. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करावी.
२) शहरातील अस्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन: शहरातील नाले तुंबले असून रस्त्यांवर घाण पाणी साचले आहे. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. घनकचरा व्यवस्थापनाअभावी कचऱ्याचे ढिगारे जागोजागी साचलेले आहेत. घंटागाड्याही नियमित फिरत नाहीत. ही परिस्थिती तातडीने सुधारावी.
३) घरकुल हप्त्यांबाबत अनास्था: गोरगरीब लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तरीही प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांचे हप्ते नगर परिषद जमा करीत नाही. यामुळे गरिबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे हप्ते तातडीने जमा करावेत.
४) खड्डेमय रस्ते आणि पावसामुळे निर्माण झालेली चिखलाची समस्या: शहरातील नवीन सिमेंट रस्त्यांवर आणि कच्च्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून चिखलामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. खड्डे तातडीने भरावेत.
५) नागरी सुविधांमध्ये दिरंगाई आणि कामकाजात हलगर्जीपणा: नागरिकांच्या विविध प्रमाणपत्रांसंबंधी कामे प्रलंबित आहेत. नामांतर, पीटीआर, जन्म-मृत्यू नोंदणी, रहिवाशी प्रमाणपत्र, व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र, गावठाण दाखले, जनावरांचे दाखले यामध्ये विलंब होतो. कामे तात्काळ पूर्ण करावीत.
६) विद्युत पोलांचे निकृष्ट दर्जाचे काम आणि भ्रष्टाचार: शहरातील विविध भागात निकृष्ट दर्जाचे पोल बसविण्यात आले असून निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता आहे. याबाबत कोणतीही चौकशी झालेली नाही. संबंधितांवर कारवाई करावी.
७) आंदोलनकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यांची नोंद: श्री. हमीद खान पठाण यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनासाठी पोलिसांचा वापर करून दबाव टाकला जात आहे. संबंधित प्रशासकावर कारवाई करावी.
८) सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची बेकायदेशीर कंत्राटी नियुक्ती: गट-क संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री. मधुकर दिवाण यांना शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात मुदतवाढ देण्यात आली आहे. ही नेमणूक मागील तारखेला (बॅक डेट) दर्शवून दिली गेली असून सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
९) भ्रष्ट अधिकाऱ्यांची सतत नियुक्ती: पाथरी नगर परिषदेला आजवर स्थायी मुख्याधिकारी मिळालेला नाही. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले आहेत. त्यामुळे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती तातडीने करावी.
१०) संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील रखडलेले प्रस्ताव: या योजनेतील लाभार्थ्यांचे पगारी प्रलंबित असून त्यांचे तात्काळ मंजुरीसाठी तहसील कार्यालयाने कार्यवाही करावी.
या मोर्चात श्री. राजेश घोडे, सुभाष कोल्हे, संतोष देशमुख, दत्ताराव मायंदळे, मुजाहेद खान, डॉ. राजेंद्र चौधरी, जुनैद खान दुर्राणी, मुखीद सेठ जाहागीरदार, विशुद्धानंद वैराळ, प्रकाश कटारे, संदिप दातारे, हन्नान खान, पिंटुसेठ बाहेती, सुनिल उन्हाळे, राजीव पामे, शेख मुस्तफा टेलर, अॅड. मलीक पटेल, नईम खान, सिकंदर टेलर, रिंकु पाटील, महिपाल सरपंच यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता.
प्रशासनाने या सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






