स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना पाथरी तालुक्यातील सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात घडली. प्रवासी ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. 15 जुलै 2025 रोजी पहाटे सुमारे 6.21 वाजता उघडकीस आली. डायल 112 वर प्राप्त झालेल्या माहितीनंतर, पोलीस अंमलदारांनी तात्काळ सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात धाव घेतली. घटनास्थळी काळसर-निळसर रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला आढळले. उपस्थित नागरिकांनी सांगितले की, अर्भक एका पांढऱ्या रंगाच्या ट्रॅव्हल्समधून फेकण्यात आले असून, गाडीवर संत प्रयाग ट्रॅव्हल्स असे नाव होते.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅव्हल्सची माहिती घेतली असता, संबंधित गाडी पुणे–परभणी व्हाया सेलू अशी सेवा करणारी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात, प्रवासादरम्यान एका महिलेला प्रसूती वेदना झाल्या व ट्रॅव्हल्समध्येच प्रसूती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नवजात अर्भक नको असल्याने गाडीतून रस्त्यावर फेकल्याची कबुली संबंधित दांपत्याने दिली.
या प्रकारामुळे नवजात अर्भकाच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 94 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पाथरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख माजीद आणि पोलीस अंमलदार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






