परतुर तहसील कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती
स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य
परतूर प्रतिनिधी : परतूर, दि. २३ मे २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री-शताब्दी जयंतीनिमित्त परतूर येथे एका प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सन्मान प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन केला जाणार आहे. हा उपक्रम अहिल्यादेवींच्या ‘लोकमाता’ आणि ‘पुण्यश्लोक’ या आदर्शांना साजेसा असून, महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी राबवला जाणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री परतुर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. ते तहसील कार्यालय परतुर येथील सभागृहात वाळूधोरण व विविध विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
पुढे बोलताना माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की पुरस्कारासाठी महिलांची निवड पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने केली जाईल. यासाठी स्थानिक समिती स्थापन करण्यात येणार असून, निकषांमध्ये किमान ५-७ वर्षांचे सातत्यपूर्ण कार्य, समाजावर झालेला सकारात्मक प्रभाव आणि प्रेरणादायी नेतृत्व यांचा समावेश असेल. अर्ज प्रक्रिया सुलभ ठेवण्यात येईल, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलाही सहभागी होऊ शकतील. अर्ज करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था आणि शाळा-महाविद्यालयांमार्फत माहिती प्रसारित केली जाईल.
पुढे आमदार बबनराव लोणीकर यांनी हे ही नमूद केले की सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. यामध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग, नाट्य, लोकनृत्य आणि गायन यांचा समावेश असेल. या कार्यक्रमांमुळे उपस्थितांना अहिल्यादेवींच्या प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाची प्रेरणा मिळेल. हा उपक्रम अहिल्यादेवींच्या कार्याचा वारसा पुढे नेणारा असून, महिलांच्या नेतृत्वाला आणि सक्षमीकरणाला चालना देणारा ठरेल. स्थानिक समुदाय, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वी होईल. सर्वांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आणि कर्तबगार महिलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!