दशरथ धनकोडी पुजारी

दशरथ धनकोडी पुजारी  (जन्म: ३० ऑगस्ट, १९३० – मृत्यू: १३ एप्रिल, २००८)
गेल्या शतकाच्या सुवर्णकाळात, मराठी संगीतविश्वात एक असा कलाकार होऊन गेला, ज्याच्या सुरांनी रसिकांच्या मनावर अजरामर गारूड केले. त्याच्या स्वरांनी आणि संगीतरचनांनी एक नवा अध्याय लिहिला. त्याच्या संगीताच्या अद्वितीय प्रवासाची सुरुवातही तितकीच अनोखी होती. मराठी सुगम संगीतात तब्बल ३५० गाण्यांना चाली देणारे, मनाच्या गाभ्यात घर करून राहिलेले आणि आजही त्यांच्या सुरेल गाण्यांनी मराठी मनाला भुरळ घालणारे अजरामर संगीतकार तथा गायक दशरथ पुजारी!
दशरथ धनकोडी पुजारी यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे आई-वडील सुरुवातीला मुंबईत वास्तव्यास होते. मात्र, योगायोगाने बडोद्याच्या राजांच्या व्याह्यांवर उपचार करण्याकरिता ते बडोद्याला गेले. पुजारी यांचे शालेय शिक्षण मुंबईतील युनियन हायस्कूलमध्ये झाले, तेव्हा ते गिरगाव भागात राहत होते. पुढे त्यांनी बार्शी येथे स्थलांतर केले आणि तिथेच त्यांना शास्त्रीय गायक गोपाळ भातंबरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शेजारी राहण्याचा लाभ घेत पुजारींनी संगीताचा गाढा अभ्यास केला. संगीताचा वारसा लाभलेले पुजारी यांना गायक म्हणून सुरुवातीला संधी मिळणं कठीण जात होतं. गायनाबाबत आत्मविश्वास नव्हता, त्यामुळे भावगीत गायला त्यांनी नकारही दिला होता. पण पुढे ते सुधीर फडके, गजानन वाटवे यांच्या तोडीचे गायक व संगीतकार बनले. ‘श्रीराम घनश्यामा’ आणि ‘हास रे मधु हास ना’ ही दोन गीते त्यांनी संगीतबद्ध केली, जी प्रमोदिनी देसाई यांच्या आवाजात अजरामर झाली. याच क्षणापासून त्यांच्या संगीतकार म्हणून वाटचालीला सुरूवात झाली. १९५२ साली आकाशवाणीची स्वरचाचणी देऊन ते नियमित गायला लागले आणि त्यांच्या नावाचा ठसा संगीतविश्वात उमटू लागला. पुजारी यांनी अनेक अवीट गोडीच्या गाण्यांना चाली दिल्या, ज्या आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘अजून त्या झुडुपांच्या मागे’, ‘आठवे अजुनी यमुना तीर’, ‘सदाफुली दोघांना हसते’ अशी त्यांच्या नावाशी कायम जोडली गेलेली गाणी. त्यांनी भावगीते, भक्तिगीते, युगुलगीते आणि अभंग या सर्वच प्रकारात अप्रतिम संगीत दिले. ‘झिमझिम झरती श्रावणधारा’, ‘अशीच अमुची आई असती’, ‘चल ऊठ रे मुकुंदा’, ‘केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ ही त्यांची अविस्मरणीय गाणी आहेत. विशेष म्हणजे, वसंत देसाईंनी रचलेल्या ‘माणुसकीच्या शत्रूसंगे’ या समरगीताचे पहिले रेकॉर्डिंग पुजारी यांनीच आकाशवाणीसाठी केले होते. पुजारी यांनी संगीतकार म्हणून अनेक नवोदितांना संधी दिली. त्यांचा आवाज आणि संगीत दिग्दर्शन कौशल्यामुळे आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांचे नाव घराघरात पोहोचले. त्यांच्या प्रतिभेचा गौरव म्हणून त्यांना ‘कवी पी. सावळाराम प्रतिष्ठेचा पुरस्कार’ तसेच ‘चतुरंग संगीत सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक ‘अजून त्या झुडुपांच्या मागे’ हे त्यांच्या संगीतमय प्रवासाचा साक्षीदार आहे. १३ एप्रिल २००८ रोजी दशरथ पुजारी यांचे निधन झाले. त्यांच्या सुरांची जादू आजही अबाधित आहे. अश्या संगीतक्षेत्रातील अवलिया संगीतकार दशरथ पुजारी यांना पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन!
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल