शक्ती सामंत (जन्म: १३ जानेवारी १९२६ ; मृत्यू: ९ एप्रिल २००९)
एका तरुणाने आपल्या खांद्यावर स्वप्नांचे गाठोडे घेऊन मायानगरी मुंबईत पाऊल ठेवले. त्याच्या मनात हिरो बनण्याची आस होती, मात्र नियतीने त्याच्यासाठी वेगळीच वाट ठरवलेली होती. जो तरुण एकेकाळी चित्रपट निर्माते फणी मजुमदार यांच्या मागे फिरत असे, नाट्यप्रयोगांमध्ये लहान भूमिका साकारत असे, तोच पुढे जाऊन हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक बनेल, याची कल्पनाही कोणी केली नसेल आणि हे तरुण म्हणजे शक्ती सामंत – एक असे दिग्दर्शक, ज्यांनी भारतीय सिनेमाला मनोरंजनाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या सिनेमांनी केवळ बॉक्स ऑफिस गाजवलं नाही, तर प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले. त्यांच्या हाताला यशाचा जणू सोनेरी स्पर्श लाभला. त्यांच्या ‘आराधना’ ने पहिला सुपरस्टार दिला, ‘कटी पतंग’ ने प्रेम आणि त्यागाची परिभाषा बदलली, ‘अमर प्रेम’ ने नात्यांच्या वेगळ्या छटा दाखवल्या, तर ‘हावडा ब्रिज’ ने थ्रिलरचा नवा आयाम निर्माण केला.
१३ जानेवारी १९२५ रोजी पश्चिम बंगालच्या बर्दवान येथे जन्मलेले शक्ती सामंत आपल्या काकांच्या घरी डेहराडून येथे वाढले. त्यामुळे त्यांना हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळाले. कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी मुंबई गाठली. मात्र, सुरुवातीला संघर्ष मोठा होता. चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यासाठी त्यांनी दापोली येथे शिक्षकाची नोकरी पत्करली आणि आठवड्याच्या शेवटी मुंबईत चित्रपटांच्या सेटवर जाऊन शुटिंग पाहू लागले. त्यावेळी बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये बंगाली कलाकार आणि तंत्रज्ञांची चलती होती. तिथेच त्यांनी ज्ञान मुखर्जी, सतीश निगम आणि फणी मजुमदार यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी चित्रपट निर्मितीच्या तंत्रज्ञानाची बारकाईने माहिती घेतली आणि आपल्या अनुभवाचा ठेवा ते समृद्ध करत राहिले. १९५५ मध्ये शक्ती सामंत यांना पहिली दिग्दर्शकीय संधी मिळाली ती ‘बहू’ या चित्रपटातून मात्र, हा चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही. ‘बहू’ नंतर शक्ती सामंत यांचा इन्स्पेक्टर हा दुसरा चित्रपट होता. थ्रिलर शैलीतील या चित्रपटात अशोक कुमार, गीता बाली आणि प्राण यांच्या दमदार भूमिका होत्या. एका खुनाभोवती फिरणाऱ्या या कथानकाने शक्ती सामंत यांना एक सक्षम दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘शेरू’ आणि ‘हिल स्टेशन’ यांसारख्या चित्रपटांनंतर त्यांनी स्वतःचे ‘शक्ती फिल्म्स’ प्रोडक्शन हाऊस सुरू केले आणि १९५८ मध्ये ‘हावडा ब्रिज’ हा क्राईम थ्रिल चित्रपट बनवला. मधुबाला आणि अशोक कुमार यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटातील ‘मेरा नाम चिन चिन चू’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
“चायना टाउन” या चित्रपटात शक्ती सामंत यांनी पहिल्यांदाच शम्मी कपूरला कास्ट केले. दुहेरी भूमिकेत शम्मी कपूरने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. यातील मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘बार बार देखो’ हे गाणे विशेष गाजले. त्यानंतर शर्मिला टागोर यांची हिंदी सिनेसृष्टीतील दमदार एंट्री ही ‘काश्मीर की कली’ या शक्ती सामंत यांच्या चित्रपटाने झाली. शर्मिला टागोरचा पहिला हिंदी चित्रपट आणि शम्मी कपूरसोबतचा रोमँटिक प्रवास. ‘ये चांद सा रोशन चेहरा’ हे गाणे आजही प्रेमिकांचे फेव्हरेट आहे. या सोबतच “अॅन इव्हिनिंग इन पॅरिस” शक्ति सामंत यांचा हा सिनेमा शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्या रोलने अधिकच मनोरंजक बनला. विशेष म्हणजे यातील ‘आसमान से आया फरिश्ता’ हे गाणे खऱ्या हेलिकॉप्टरवर शूट करण्यात आले होते!
त्या नंतर शक्ति सामंत यांचा “आराधना” हा चित्रपट म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतली क्रांतीच. राजेश खन्ना यांना ‘सुपरस्टार’ ही पदवी याच सिनेमाने मिळवून दिली. ‘मेरे सपनों की रानी’ आणि ‘रूप तेरा मस्ताना’ ही यातील गाणी आजही अमर आहेत. त्या नंतर कटी पतंग आशा पारेख यांच्या दमदार अभिनयाने सजलेला चित्रपट. विधवेच्या संघर्षावर आधारित या सिनेमात राजेश खन्नाची जादू होती यातील ‘ये शाम मस्तानी’ आणि ‘प्यार दीवाना होता है’ ही गाणी आजही कानात रेंगाळतात. ‘अपने प्यार के सपने सच हुए’ आणि ‘कालीराम का खुल गया पोल’ या गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेला “बरसात की एक रात” हा ही चित्रपट अप्रतिमच अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांच्यासोबत शक्ती सामंत यांनी हा दमदार चित्रपट साकारला. बंगाली सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट.
शक्ती सामंत हे केवळ दिग्दर्शक नव्हते, तर ते सिनेसृष्टीत यशाचे दुसरे नाव होते. त्यांच्या चित्रपटांनी हिंदी सिनेमाला नवी उंची मिळवून दिली. आजही त्यांच्या सिनेमातील गाणी, संवाद आणि कथा लोकांच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा वारसा हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सुवर्णअध्याय आहे. शक्ती सामंत यांच्या चित्रपटांमध्ये गाण्यांचे स्थान महत्त्वाचे होते. आनंद बक्षी, इंदिवर यांसारख्या गीतकारांसोबत त्यांनी उत्कृष्ट गीतसंहिता साकारली. किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले यांसारख्या दिग्गज गायकांना त्यांनी नवनवीन संधी दिल्या. शक्ती सामंत यांना ‘आराधना’, ‘अनुराग’ आणि ‘अमानुष’ यांसाठी तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यांनी इंडियन मोशन पिक्चर असोसिएशनचे पाच वर्षे नेतृत्व केले, तसेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे सात वर्षे अध्यक्षपद भूषवले आणि सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूटचेही नेतृत्व केले पण १९८० नंतरच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत बदल झाले, ज्यात शक्ती सामंत तेवढे सहज सामावू शकले नाहीत. त्यांनी बंगाली चित्रपटांकडे वळण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही फारसे यश मिळाले नाही. ९ एप्रिल २००९ साली शक्ती सामंत यांनी जगाचा निरोप घेतला. शक्ती सामंत हे केवळ दिग्दर्शक नव्हते, तर एक कथा सांगणारे कलाकार होते. त्यांच्या चित्रपटांनी प्रेम, भावनांची नवी परिभाषा मांडली आणि रसिकांना एक वेगळ्या दुनियेत घेऊन गेले. आजही त्यांचे चित्रपट पाहताना काळ थांबला आहे असे वाटते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






