राजाभाऊ मंगळवेढेकर (जन्म: ११ डिसेंबर १९२५, मृत्यू :१ एप्रिल २००६)
“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,
चंदेरी, सोनेरी चमचमता चांगला…”
ही ओळ ऐकताच आठवणींच्या गोडसर लाटांनी मन भरून जातं. बालपणीच्या रम्य जगात परत घेऊन जाणारं हे गाणं केवळ लहान मुलांसाठी नव्हे, तर प्रत्येक पिढीच्या आठवणींशी घट्ट जोडलेलं आहे. राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या लेखणीने साकारलेली ही जादू आजही तेवढीच ताजीतवानी वाटते. मराठी साहित्याच्या नंदनवनात कविता, कथा, कादंबऱ्या यांचे असंख्य प्रकार आहेत. पण त्यातलं सगळ्यात गमतीदार आणि मनाला जवळचं वाटणारं साहित्य म्हणजे बालसाहित्य! लहानग्यांसाठी बडबडगीते, साहसकथा, नीतिकथा, गमतीशीर गोष्टी, प्रवासवर्णनं, आणि कधी कधी छोटी कादंबरीही असते. या क्षेत्रात आपली अढळ जागा निर्माण करणाऱ्या साहित्यिकांमध्ये राजाभाऊ मंगळवेढेकर यांचे नाव अग्रस्थानी आहे.
११ डिसेंबर १९२५ रोजी जन्मलेल्या या थोर साहित्यिकाने आपल्या लेखणीने बालपणाचा आनंद द्विगुणित केला. वसंत नारायण मंगळवेढेकर या नावाने ओळखले जाणारे राजाभाऊ हे केवळ बालसाहित्यिक नव्हते, तर एक उत्तम कवी, नाटककार, अनुवादक आणि विज्ञान-पर्यावरण यांसारख्या क्षेत्रात लिखाण करणारे अष्टपैलू लेखक होते.
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला आणि तिथूनच त्यांच्या लेखणीला एक नवा दृष्टिकोन मिळाला.
“करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल प्रभूशी नाते तयाचे”
या साने गुरुजींच्या उक्तीनुसार, त्यांनी आपल्या साहित्याला केवळ बालमनाच्या आनंदापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर त्यातून संस्कारही रुजवले.
मंगळवेढेकरांनी बालकांसाठी विपुल लेखन केलं. “सुलभ रामायण”, “सुलभ महाभारत”, “ज्ञानयोगी ज्ञानेश्वर”, “लोकात्मा तुकाराम”, “राष्ट्रपिता गांधी”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, “पंडित जवाहरलाल नेहरू”, “मराठमोळा महाराष्ट्र” यांसारख्या चरित्रपर पुस्तकांपासून ते थेट स्टिव्हनसनच्या “Treasure Island” च्या “बारकू” या नावाने केलेल्या अनुवादापर्यंत त्यांनी साहित्यविश्व समृद्ध केलं.
मोठ्यांसाठीसुद्धा त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं. “मित्राय नमः”, “तरुण मित्रा”, “कहाणी एका प्रयोगाची”, “चित्रांगण”, “ग. दि. मा.” ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत.
राजाभाऊंनी कथाकथन या संकल्पनेला वेगळ्या उंचीवर नेलं. “कथा आणि कथाकथन” या पुस्तकातून त्यांनी कथाकथनाची तंत्रं उलगडून सांगितली. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट ग्रंथ पारितोषिक मिळालं आणि त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या अतुलनीय साहित्यसेवेसाठी त्यांना जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
फक्त साहित्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी राष्ट्रसेवादल, साने गुरुजी कथामाला आणि आंतरभारती या संस्थांमध्ये सक्रिय योगदान दिलं. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सहभाग त्यांच्या लेखणीतूनही झळकत राहिला.
राजाभाऊ मंगळवेढेकर म्हणजे केवळ लेखक नव्हते, तर बालकांच्या भावविश्वाशी नातं जोडणारे जिवलग मित्र होते. त्यांनी लिहिलेल्या साहित्याने बालपणाच्या आठवणी समृद्ध केल्या आणि स्वप्नं रंगवण्याची नवी दृष्टी दिली.
त्यांचं संपूर्ण लेखन “राजा मंगळवेढेकर” या नावाने प्रकाशित झालं आणि ते मराठी बालसाहित्याच्या सुवर्णपानांवर अजरामर झाले. १ एप्रिल २००६ रोजी राजाभाऊ आपल्यातून गेले पण त्यांचे लिखाणातून ते कायम साहित्यविश्वात राहतील. राजा मंगळवेढेकर यांना स्मृतीदिनानिमित विनम्र अभिवादन
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






