परतूर प्रतिनिधी : तांडा येथील १७ शेतकऱ्यांचे कापूस पीक बोगस खतामुळे जळाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात १८ हेक्टर च्या वर कापसाचे नुकसान झाले असून या विषयी कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, शनिवारी (दि.२०) कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. या विषयी अधिक माहिती अशी की, हास्तूर तांडा येथील शेतकऱ्यांनी एका कृषी सेवा केंद्रातून कपाशीच्या बॅगा घेतल्या व लागवड केली. वेळेत लागवड झाल्याने कपाशी देखील चांगली उगवली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी याच दुकानातून कपाशीसाठी खते ज्यात पोटॅश, सुपर फॉस्फेट, युरिया घेतला, त्यानंतर कपाशीला खत दिले. मात्र, पिकांची चांगली वाढ होण्याऐवजी कापूस पिवळे हास्तूर तांडा येथे खत दिल्यानंतर जळत असलेल्या कपाशी पिकाची पाहणी करताना कृषी विभागाचे पथक. पडून झाडे जळत असल्याचे प्रकार समोर आला. त्यामुळे बियाणे खर्चासोबतच पीक वाया गेल्याने मोठे नुकसान झाल्याने संबंधित खताच्या कंपनी विरुद्ध कार्यवाहीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी विभागाला निवेदन दिले. कृषी विभागाच्या वतीने आज अशोक कालिदास आढे यांच्या कापूस पिकाची समितीने पाहणी केली. तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातही पाहणी केली. कापूस पिकाचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शी समितीस आढळून आले आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार सरदार केमिकल पीडीएम पोटॅश हे खत कापूस पिकास पीक उगवल्या नंतर टाकण्याचा सल्ला दुकानदाराने दिला होता. मात्र खत टाकल्या नंतर कापूस पिकाची वाढ होणे थांबले व झाड पिवळे पडून वाळून गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी या पथकात उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, खरपुडी येथील कृषी शात्रज्ञ अजय मिटकरी, तालुका कृषी अधिकारी ए. एच.माने, मंडळ कृषी अधिकारी श्री. सांगावे, क्षी सहायक अनिल मस्के, ए.पी.तंत्र अधिकारी वैद्य, सरपंच निर्धास राठोड, उपसरपंच नवनाथ आहे, पीडित शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, पीडित शेतकऱ्यांनी कंपनीवर कार्यवाही करण्याच्या मागणीसह नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






