स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रभारी तथा प्रदेश महामंत्री माधवी नाईक यांच्या कार्यपद्धतीविरोधात पक्षातील काही अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाईक यांची प्रभारी पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा काही कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतील, असा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनुसूचित जाती मोर्चाच्या कामकाजात कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळत नसल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. तळागाळात काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असून, पक्षातील पदांची निवड करताना कार्यकर्त्यांच्या कामापेक्षा इतर बाबींना प्राधान्य दिले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तायडे यांनी माधवी नाईक यांची प्रभारी पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करत, मागणी मान्य न झाल्यास पक्ष बदलण्याचा इशारा दिला. तर वाल्मिकता निकाळजे यांनी गेल्या काही वर्षांपासून मनमानी कारभाराद्वारे दलित नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
डॉ. नेपाल रंगारी यांनी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षात पूर्वी असलेली किंमत कमी झाल्याची खंत व्यक्त केली. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत काही व्यक्तींचे वर्चस्व निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त करत, अशा प्रवृत्तींना पक्षाने चपराक बसविण्याची गरज असल्याचे म्हटले.
सोपिनील भालेराव (नागपूर) यांनी अनुसूचित जाती मोर्चातील कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक ताकदीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. आमदारांना निवडून आणण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
नितीन मोरे (मुंबई) यांनी अनुसूचित जाती मोर्चाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचा आरोप केला. पक्षाच्या संघटनेत सर्व समाजघटकांना आणि कार्यकर्त्यांना समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. चांगदेव कांबळे (पंढरपूर) यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना पदे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
लता बाविस्कर (जळगाव) यांनी भाजप किंवा अनुसूचित जाती मोर्चा हा कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचा नसल्याचे सांगत, मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. बैठकीमध्ये सत्य भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, गणेश कांबळे (नाशिक) यांनी आपण गेल्या 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षासाठी काम करत असल्याचे सांगितले. कोणत्याही राजकीय किंवा शासकीय पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष संघटना वाढविण्यासाठी काम केले. मात्र, बैठकीतील मतभेदांमुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. आपण पक्ष सोडणार नसून पक्षासाठी काम सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महेंद्र खैरनार (धुळे) यांनीही माधवी नाईक यांच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र भूमिका घेतली. तळागाळातील कार्यकर्त्यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले असताना त्यांना योग्य संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या स्पर्धकाला पुढे जाऊ न देण्याची मानसिकता पक्षाच्या हितासाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच नाईक यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
संयम राखण्याचे आवाहन
या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्जेराव जाधव यांनी मात्र कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. पक्षात पदे येतात आणि जातात; मात्र कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक बांधिलकी सोडू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दलित चळवळ कोणीही संपवू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रावसाहेब पाटील दानवे, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम सुरू ठेवावे, असे आवाहन केले.
पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष
अनुसूचित जाती मोर्चातील या नाराजीमुळे भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक राजकारणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पक्ष नेतृत्व आणि माधवी नाईक यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या तक्रारींची पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन संघटनात्मक पातळीवर चर्चा करावी, जुन्या व तळागाळातील कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे आणि निर्माण झालेली नाराजी दूर करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






