स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
गावात जायला रस्ता नाही, नाल्या तुंबल्या, फिल्टरला पाणी नाही; लाखोंचा निधी गेला कुठे? ग्रामस्थांचा सवाल
आष्टी : परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथील दलित वस्तीमध्ये जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून, ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप येथील नागरिकांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, वस्तीत जाण्यासाठी मुख्य रस्ता नसल्यामुळे नागरिकांना, विशेषतः वृद्ध आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. विशेष म्हणजे स्मशानभूमीसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.गावातील नाल्या स्वच्छ न केल्यामुळे त्या तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, याच कारणामुळे एक नागरिक गंभीर आजारी पडून मृत्यूशी झुंज देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पाणी, शिक्षण आणि अंगणवाडीतही भ्रष्टाचार
गावात वॉटर फिल्टर बसवण्यात आला आहे, मात्र त्यात पाणीच येत नाही. केवळ शोभेची वस्तू बनला आहे. बोर आणि पाण्याच्या टाकीच्या नावावर लाखो रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत.तसेच शाळेच्या दुरुस्ती व विकासासाठी आलेला लाखोंचा निधी खर्चच करण्यात आला नाही. अंगणवाडीच्या नावावरही लाखोंचे बिल काढून केवळ बाहेरून रंगरंगोटी करण्यात आली असून, आतून अंगणवाडी पूर्णपणे गळत असल्याने लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.पात्र असूनही दलित कुटुंबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
५ वर्षांपासून ग्रामसभा नाहीच
गावात गेल्या ५ वर्षांपासून एकही ग्रामसभा झाली नसल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व समस्यांबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी आणि दलित वस्तीला तात्काळ रस्ता, पाणी व आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी गंगासावंगी येथील संतप्त नागरिकांकडून होत आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






