स्वराज्य वार्ता / राम राठोड,
वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी दरमहा ५० हजार हप्त्याची मागणी; एसीबीची धडक कारवाई
मंठा पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली असून पोलीस निरीक्षकासह एका पोलीस अमलदाराला ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे मंठा पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणात पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड आणि पोलीस अमलदार रवी जाधव (बकल नं. ७८८) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदाराकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी दरमहा ५० हजार रुपयांचा हप्ता मागितल्याची तक्रार होती. त्यापैकी सुरुवातीला १० हजार रुपये देण्याचे सांगितले होते, मात्र पुढे व्यवहार ठरवून ३० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले.
यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार मंठा पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अमलदार रवी जाधव यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. तपासादरम्यान आरोपीकडून ३० हजार रुपयांची लाच रक्कम व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांचाही मोबाईल तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळु जाधवर करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तीगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे व पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






