परतूर : मराठा सेवा संघातर्फे बक्षीस वितरण,सत्कार सोहळा
स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर : राजकारणात युवकांची भूमिका स्वच्छ, पारदर्शक, आणि मूल्याधिष्ठित असावी. सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी राजकारण करावे ,सामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणे हाच खऱ्या राजकारणाचा उद्देश असून लोकांसाठी नव्हे तर लोकांसोबत काम करण्याची सेवाभावी राजकीय भूमिका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे असे मत जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि सर्व कक्षांच्या वतीने सावित्रीबाई फुले ते राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊ दशोरात्र जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार सोहळा रविवारी ( ता.18) मराठा क्रांती भवनात संपन्न झाला. याप्रसंगी वक्ते म्हणून डॉ.शशिकांत पाटील बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संदिपान जाधव हे होते. विभागीय उपाध्यक्ष काकासाहेब खरात, विभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानदेव नवल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.शशिकांत पाटील यांनी आश्वासनांवर विश्वास ठेवण्याचा काळ संपला असून युवक हीच खरी समाजाची ताकद आहे ,उद्याचे नेतृत्व करण्यासाठी युवकांनी स्वतःच प्रकाश बनावे , नकारात्मक राजकारणापासून दूर राहून हिंसक, जातीवाद ,द्वेष यांना थारा न देता एकतेचे व समतेचे राजकारण करावे असे डॉ पाटील यांनी सांगितले.
डीवायएसपी रामेश्वर रिंगे यांनी यावेळी बोलतांना विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून विद्यार्थ्यांनी मैदानावर जावे आणि आपल्या आवडीचा एक तरी खेळ खेळला पाहिजे असा सल्ला दिला. संदीपान जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक प्रा. संभाजी तिडके यांनी ,सूत्रसंचालन प्रा. डॉ.पांडुरंग नवल यांनी केले तर विष्णु शिंदे यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्ष प्रियंका राक्षे ,उपनगराध्यक्ष विशाखा राखे
यांच्या सह नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला तसेच वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि सर्व कक्षांचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






