खेड्याकडे चला” – बापूजींच्या पावन सेवाग्राममधून ग्रामीण पत्रकारांचा हक्कलढा

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

पत्रकार संरक्षण समिती या मान्यताप्राप्त संघटनेच्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलन वर्धा येथील सेवाग्राम मध्ये बापू कुटी येथे मोठ्या दिमाखात पार पडले.

“खेड्याकडे चला” हा बापूजींचा मंत्र. त्याच सेवाग्रामच्या पावन भूमीत, जिथे महात्मा गांधींनी राष्ट्राला सत्य व अहिंसेचे धडे दिले, तिथेच ग्रामीण पत्रकारांनी आपल्या अस्तित्वाचा, हक्काचा व सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे पत्रकार—मातीशी जोडलेले, गावागावातल्या लोकवास्तवाचे साक्षीदार—आज बापूंच्या प्रेरणेने एकत्र आले आणि ठराविक आवाजात सांगून गेले की “आमची उपेक्षा थांबवा, आमचा सन्मान करा.”

ग्रामीण पत्रकारांची वेदना
गावखेड्यातील रस्त्यावरील चिखल, शेतकऱ्याच्या आयुष्यातील संकटे, शाळेतल्या मुलांची धडपड, ग्रामपंचायतीतील अडचणी—हे सर्व प्रथम उघड करणारा पत्रकार हा खरा ग्रामदूत. पण दुर्दैव असे की, त्यालाच शासन-प्रशासनाकडून उपेक्षा मिळते. आजही ग्रामीण पत्रकारांना बस-रेल्वे सवलत नाही, पत्रकार भवन नाही, हल्लाविरोधी संरक्षण नाही, पेन्शन नाही, आणि आजारपणात मोफत उपचार नाहीत. “मातीतल्या घामाने बातम्या लिहिणाऱ्या या पत्रकारांना उपेक्षेच्या सावलीत जगावे लागते, हे सरकारसाठी लज्जास्पद नाही काय?” – असा प्रश्न संमेलनात उपस्थित झाला.

संमेलनाचा स्वर
१७ ऑगस्ट रोजी सेवाग्रामच्या यात्री निवास बापुकुटी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पत्रकार संरक्षण समितीच्या संमेलनात याच मुद्द्यांवर ठराव पारित करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थापक विनोद पत्रे होते. आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, आ. सुमित वानखेडे यांसह अनेक मान्यवर, अधिकारी व जेष्ठ पत्रकार उपस्थित होते. ज्येष्ठ व्याख्याते राम खुर्दळ यांनी भावनिक शब्दांत ग्रामीण पत्रकारांची व्यथा मांडली— “ज्या भूमीत गांधींनी खेड्याकडे चला म्हटलं, त्याच भूमीत ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न मात्र कायम अंधारात आहेत. आता शासनाने आमची वेदना ऐकलीच पाहिजे.”

मागण्या आणि ठराव…
या संमेलनात सर्वांनी एकमुखाने मान्यता दिलेल्या मागण्या अशा होत्या –
– ग्रामीण पत्रकारांना ‘ग्रामदूत’ म्हणून सन्मान व शासकीय समित्यांवर स्थान.
-प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन उभारणी.
– ग्रामीण पत्रकारांना बस-रेल्वे सवलत.
-जेष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना व मोफत उपचार.
-पत्रकार कल्याण निधी व मुख्यमंत्री आरोग्य योजनेत गरजूंना प्रत्यक्ष मदत.
– हल्ला वा दमदाटी झाल्यास तत्काळ न्याय व संरक्षण.

आश्वासने आणि साथ —-
आ. राजेश बकाने यांनी ५० लाख निधी पत्रकार भवनासाठी देण्याचे जाहीर केले.
आ. सुमित वानखेडे यांनी निवास व्यवस्थेसाठी विधीमंडळात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.
जेष्ठ पत्रकार प्रा. राजू गोरडे यांनी भावनिक आवाहन केले – “हा लढा ग्रामीण पत्रकारांच्या दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धासारखाच असेल.”
लोकमतचे नरेश डोंगरे, सकाळचे प्रमोद काळंबांडे यांसह मान्यवरांनी ग्रामीण पत्रकारांच्या लढ्यास खंबीर साथ देण्याची ग्वाही दिली.

सेवाग्रामची प्रेरणा—-
सेवाग्राम हीच ती जागा जिथे बापूंनी सत्य, अहिंसा आणि न्यायाचे धडे दिले. आज इथून ग्रामीण पत्रकारांनी नव्या संघर्षाची शपथ घेतली. त्यांचा लढा केवळ वैयक्तिक नसून—तो ग्रामीण भारताच्या आवाजाचा लढा आहे. कारण गावातली धडपड, शेतकऱ्याची हाक, समाजातील सत्य याला प्रथम दिशा देणारा आवाज हाच पत्रकाराचा असतो.
या वेळी पाथरीचे नवराष्ट्र प्रतिनिधी उध्दव इंगळे, पत्रकार आयुबखान, पत्रकार तथा समाज सेविका रेखा मनेरे तसेच पत्रकार संरक्षण समितीचे मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी उपस्थित होते.

शेवटचा शब्द…
राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता झाली, पण मनामनात नवा निर्धार निर्माण झाला. “या बहिऱ्या-आंधळ्या सत्तेला आमचा आवाज ऐकवायलाच हवा,” ही भावना ठाम झाली. बापूंच्या सेवाग्राममधून सुरू झालेली ही ज्योत ग्रामीण पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी एक नवा इतिहास घडवेल, अशीच आशा व्यक्त करण्यात आली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल