स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे गुरुवारी मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या प्रमुख उपस्थितीत समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून दुर्राणी यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत राजकीय वर्तूळात चर्चा सुरु होती. विशेषतः काँग्रेसचे नेते इम्रान प्रताप रुडी यांच्याशी संपर्क साधून दुर्राणी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर हितगुज करीत गुरुवारी (दि.7) मुंबईत पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरविला.दुर्राणी यांचे परभणीतील काही महापालिकेतील माजी सदस्य तसेच पाथरी नगर पालिकेतील माजी पदाधिकारी व सदस्य, पाथरी बाजार समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत माजी पदाधिकारी व काही समर्थक सदस्य हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.दरम्यान, दुर्राणी यांनी मंगळवारी परभणीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत, असे स्पष्ट करीत काँग्रेसची विचारधारा मिळती जुळती आहे. विशेषतः काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून सर्वदूर परिचित आहे. भारतीय जनता पार्टी सारख्या सत्तारुढ पक्षाच्या विरोधात दिल्ली पासून गल्ली पर्यंत काँग्रेसनेच मोठा लढा सुरु ठेवला आहे. धर्म निरपेक्ष विचारधारेतून पक्ष सर्वदूर सक्षम होत आहे. त्या तूलनेत प्रांतीय पक्षांवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आहेत. भारतीय जनता पार्टीने प्रांतीय पक्षांना कमकुवत करण्याचं काम युध्द पातळीवर सुरु केलं आहे. त्यामुळे या अभूतपूर्व परिस्थितीत काँग्रेसच धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून सर्वदूर भरारी घेईल, असा आपला विश्वास आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षात आपण प्रवेश करीत आहोत. कोणतीही अट किंवा शर्थ नाही, काँग्रेस श्रेष्ठींद्वारे भविष्यात जी काही जबाबदारी सुपूर्त केली जाईल, ती आपण समर्थपणे पेलू, असा विश्वास दुर्राणी यांनी व्यक्त केला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






