स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या २४ जुलै २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील सेलू कॉर्नर येथील राष्ट्रीय महामार्गावर शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन होणार असून, याबाबतचे अधिकृत निवेदन प्रहार दिव्यांग आंदोलन संघटनेचे पाथरी तालुका अध्यक्ष श्री. सुनील महादेव ढवळे व. देवलीग देवळे यांनी पाथरी पोलीस स्टेशनला सादर केले आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
शेतकरी कर्जमाफी तत्काळ जाहीर करावी
“सातबारा कोरा” आदेशाची प्रभावी अंमलबजावणी
दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, व कामगारांच्या प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य कराव्यात
आंदोलनाची वैशिष्ट्ये:
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मूल्यांना धरून पार पडेल. रुग्णवाहिका, अग्निशामक व आपत्कालीन सेवा यांना कुठलाही अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संघटनेचे स्वयंसेवक तैनात असतील. ध्वनीप्रदूषण अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळले जाईल, अशी ग्वाहीही निवेदनात देण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनास विनंती:
या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच प्रशासनाने आंदोलनास आवश्यक ते सहकार्य करावे, अशी नम्र मागणी श्री. सुनील महादेव ढवळे यांनी निवेदनात केली आहे.
या आंदोलनास शेतकरी व कष्टकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भावना संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






