स्वराज्य वार्ता अहमद अन्सारी पाथरी
परभणी प्रतिनिधी : परभणी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (Rऊध्) गेल्या काही वर्षांत झालेल्या सातत्यपूर्ण लाचखोरी प्रकरणांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच वरिष्ठ अधिकार्यांचाही या भ्रष्टाचारात सहभाग आहे का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूजचे संपादक सलीम इनामदार यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी राज्याच्या राज्यमंत्री व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अधिकृत निवेदन सादर केले.
लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी १ मे २०२५ रोजी परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. या निवेदनात वर्ष २०२१ ते २०२५ दरम्यान झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांचे तपशील देण्यात आले आहेत.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, १८ नोव्हेंबर २०२१ रोजी एक मोटार वाहन निरीक्षक व खाजगी व्यक्तीवर कारवाई, ३० जून २०२२ रोजी एका कनिष्ठ लिपिकावर लाचप्रकरणी कारवाई, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी एक वरिष्ठ लिपिक व खाजगी व्यक्तीवर कारवाई, तसेच २१ फेब्रुवारी २०२५ रोजी परभणी आरटीओ कार्यालयातील दुसर्या मोटार वाहन निरीक्षकावर कारवाई करण्यात आली. याच दिवशी बीड आणि चंद्रपूर आरटीओ कार्यालयात देखील अँटी करप्शन विभागाने कारवाई केली होती, अशी माहिती निवेदनात दिली आहे. याशिवाय, नोव्हेंबर २०२३ मध्ये एका सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला असून, दुसर्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकार्यावर चोरीच्या वाहनांची नोंदणी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे सुद्धा नमूद करण्यात आले आहे. या सर्व घटनांची पार्श्वभूमी मांडताना सलीम इनामदार यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर सतत असे प्रकार होत असतील तर यामागे वरिष्ठ अधिकार्यांचीही ढिलाई आहे की, त्यांच्या मूकसंमतीनेच हे सर्व चालते आहे? परभणी आरटीओ कार्यालयात लाच दिल्याशिवाय जनतेची कामे होत नसल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी तक्रारही या निवेदनात स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. या संदर्भात कारवाई करण्याची व आरटीओ कार्यालयातील प्रस्थापित भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्याची मागणीही सलीम इनामदार यांनी केली आहे. या निवेदनावर लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूजचे संपादक सलीम इनामदार यांची स्वाक्षरी आहे व निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकरी यांना देण्यात आले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






