स्वराज्य वार्ता / किसन बी पवार
माजलगाव प्रतिनिधी : किट्टी आडगाव येथील बाबासाहेब आगे या तरूणाचा गावचा जावई असलेल्या नारायण फपाळ याने सत्तूरचे वार करीत खून केला. या खुनाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर अवघ्या काही क्षणात व्हायरल झाला. सत्तुरचे वार करताना ‘बलात्कारी आहे हा’ असे आरोपी फपाळ जोरजोराने ओरडत होता. त्यावरून अख्ख्या महाराष्ट्राने बाबासाहेब आगे या तरूणावर बलात्कारी असल्याचा शिक्का मारत त्याच्या चारित्र्याचे धिंडवडे काढले. एकाच गावात, अगदी घरासमोर राहणार्या त्या दोघांत खरेच असे काही होते का? की नुसत्या संशयावरून हा प्रकार घडला? गेल्या दोन दिवसातील कुजबूज तर हेच सांगतेय की नुसत्या संशयावरून बाबासाहेब आगेचा हकनाक बळी गेला. आधीच डोंगराएवढं कोसळलेलं दुःख कवटाळून रडत बसायचं की मृत्यू पश्चात चारित्र्यावर होत असलेली चिखलफेक थांबवायची यानं कुटुंब हतबल अन् व्याकूळ झालं आहे. ग्रामस्थांचीही अवस्था अशीच आहे.
बाबासाहेब आगे हा तरूण गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत असे. त्याचंही लग्न झालेलं होतं. त्याला एक दोन वर्षाची मुलगी आहे. सध्या त्याची पत्नी तीन महिन्यांची प्रेग्नंट आहे. या दोघा नवरा बायकोत समोरच्या ‘त्या’ मुलीवरून कधी भांडण तंटे झालेत असे नाही. इकडे नारायण फपाळ हा मुळातच संशयी वृत्तीचा. तो सतत आपल्या पत्नीवर संशय घेत असायचा. त्यामुळे या दोघा-पती पत्नीत अनेकदा वाद झाले. या वादामुळे कित्येकदा पत्नी माहेरी म्हणजेच किट्टी आडगाव या ठिकाणी असायची. आपल्या सासरवाडीला नारायण फपाळ हा कधीमध्ये यायचा. यावेळी तिथेही तो पत्नी आणि सासर्यांसोबत भांडण करायचा. सहाजिकच बाबासाहेब आगे यात मध्यस्थी करायला लागला. मात्र आगेची मध्यस्थीच संशयी नारायण फपाळ याला खटकली. तो त्याच्यावर देखील संशय घेवू लागला. नंतर त्याचा हा संशय छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाढत गेला. त्याने बाबासाहेबला बाहेर बोलावून घेत माझ्या पत्नीत आणि तुझ्यात काय आहे अशी विचारणा देखील केली. त्यावेळी बाबासाहेब आगे याने त्याचा संशय दूर केला होता. मात्र एकदा नारायण फपाळ हा किट्टी आडगाव येथे रात्रीच्या सुमारास आला. आणि आपल्या सासर्याच्या घरासमोर धिंगाणा घालू लागला. सासर्याला मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. त्यावेळी सासर्याने समोरच राहणार्या बाबासाहेबाला आवाज दिला. बाबासाहेबही त्यावेळी धावत बाहेर आले आणि त्याने नारायण फपाळ याला तंबी दिली. मात्र आधीच संशयाचं भूत नारायणच्या डोक्यात नाचत होतं. या तंबीने तर तो सुडाने पेटून उठला. आमच्या भांडणात हा का येतो? असं तो आपल्या मित्रांना विचारायचा? मित्रांनी देखील त्याला अनेकदा समजावून सांगितले. परंतु तरीही त्याच्या डोक्यातील संशयाचं भूत काही जाता जात नव्हते. 15 एप्रिल रोजी तो बाबासाहेब आगे याला शोधतच भाजपा कार्यालयात घुसला. त्यावेळी तिथे काही लोकही होते. लोकांनी सोडवा सोडवी केली. आणि तेथून नारायण फपाळ याला काढून दिले. मात्र नारायण फपाळ काहीवेळ बाजुच्या एका बोळीत दबा धरून बसला होता. थोड्यावेळाने बाबासाहेब आगे भाजपा कार्यालयातून बाहेर पडत नाही तोच दबा धरून बसलेला नारायण फपाळ त्याच्याकडे धावत आला. यावेळी काही लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला. त्यात एकाला दुखापत देखील झाली आहे. यावेळी त्याने शर्टात पाठीमागे लपवलेलं सत्तूर बाहेर काढलं. नारायणच्या हातातील शस्त्र पाहून हडबडून गेलेला बाबासाहेब आगे जिवाच्या आकांताने पळू लागला. 100 मीटर अंतरावरच नारायणने त्याला गाठत त्याच्या मानेवर पहिला वार केला. या एकाच वारात बाबासाहेब आगे खाली कोसळला होता. कोसळल्यानंतरही नारायणने त्याच्यावर सपासप वार करणे सुरूच ठेवले. बाबासाहेब आगे याला वाचविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु नारायण फपाळ याने ‘कोणी मध्ये आला तर त्यालाही जीव मारून टाकेल’ अशी मोठ आवाजात धमकी दिली होती. त्यामुळे काहींनी त्याला लांबुनच दगडं मारण्याचा प्रयत्न करून पाहीला. मात्र ही घटना एका आडोशाच्या ठिकाणी झाल्याने बाबासाहेबला वाचविण्याचे सगळ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला त्यावेळीही तो अनैतिक संबंधाचीच भाषा बोलत होता. त्यामुळे बाबासाहेब कितीही चांगला असला तरी त्याची बाजू सांगणारं त्याक्षणी कोणी नव्हतं. मात्र जसा जसा या प्रकरणात वेळ गेला तसे बाबासाहेब आगेबद्दल आणखी माहिती मिळू लागली. त्याच्या चारित्र्यावर संशय घेता येईल, असं त्याचं वागणं, बोलणं अजिबात नव्हतं. त्याला लहानपणापासून ओळखणारे, त्याच्यासोबत राहणारे, त्याच्या गावातील विरोधक या कुणाचंच त्याच्या चारित्र्याच्या बाबतीत वाईट मत नव्हते. मात्र तो केवळ भाजपचा पदाधिकारी असल्याने आणि त्याला अनैतिकतेची झालर लावल्याने लोक बातमीच्या खाली कमेंट करून नाही नाही ते बोलू लागले. जोवर पुरेशी माहिती नव्हती तोपर्यंत हे समजू शकतो. मात्र त्याच्या चारित्र्याबद्दल चांगला संदेश जावा म्हणून ग्रामस्थांनी गावातून कँडल मार्च काढला. शोकसभा घेतली. आज माजलगावातही शोकसभा झाली. त्यानंतर तरी या पोर्टल पत्रकारांनी माणुसकी जपणं महत्वाचं होतं. मात्र घटनेची पूर्ण हकीकत समोर आल्यानंतरही त्यांनी जास्तच ताळतंत्र सोडलं. प्रत्येक तासाला तीच बातमी नव्याने पोस्ट करीत प्रचंड टीआरपी मिळवला. हा प्रकार तब्बल तीन दिवस सुरू आहे. कदाचित चौथ्याही दिवशी सुरूच असेल. पण टीआरपीच्या नादात एका चांगल्या व्यक्तीला अनैतिकतेचं लेबल लावून मृत्यू पश्चात त्याच्या चारित्र्याचे धिंडवडे उडवून मागे राहीलेल्या कुटुंबाचा मीडिया आणि फेसबुकी समाज विचार करणार आहे की नाही? नुसत्या संशयावरून घडलेल्या घटनेत आरोपी नारायणच्या पत्नीलाही नको नको ते बोल लावणे समाजाने थांबवले पाहीजे. बाबासाहेब हा घरातील कर्ता पुरूष होता. गावासाठीही त्याचं योगदान मोठं होतं. भाजपा पक्षासाठी कठीण काळात त्यानं खिंड लढवली आहे. मुळात त्याची हत्या झाली तीच दुसर्याच्या मदतीला गेला म्हणून. अशा लोकोपयोगी कार्यकर्त्याचं बलीदान वाया जावू नये. कोल्हापुरच्या जवानाला माजलगाव धरणात वीर मरण आलं त्यावेळी हाच माजलगावकर त्यांच्या मदतीसाठी धावून गेला होता. संतोष देशमुखांसाठी याच माजलगावकरांनी मोठी मदत दिली. बाबासाहेब आगे याचं कुटुंब माजलगावकर उघड्यावर पडू देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. पंकजाताई मुंडेंनी मागे राहीलेल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी स्विकारली आहे. फेसबुकी समाजाने आपल्याकडून मदत नसेल होत तर तोंडातून अन् की पॅडच्या बटनांमधून वाईट काही बाहेर पडू देवू नये. तुमचा एवढाच उपकारही खूप झाला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






