प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
राज्यात स्वच्छ आणि हरित उर्जेसाठी सौर योजनांचा लाभ घ्या – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे
• उर्जा राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे यांचा सत्कार
परभणी, दि.25/04/2025. राज्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी आणि वापर वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसेच राज्यात स्वच्छ, हरित आणि अखंड उर्जेसाठी सौर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री पदी वर्णी लागल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांचा आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ऑडिटोरिएम हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रा मणि, महापारेषण कंपनीचे संचालक प्रकल्प अविनाश निंबाळकर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन, उपसरचिटणीस नानासाहेब चट्टे, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, छत्रपती संभाजीनगरचे सय्यद नसीर कादरी, महानिर्मितीचे मुख्य महाव्यवस्थापक अनंत कोंत, धनंजय औंढेकर, जाफर पठाण लातूरचे अरविंद बुलबुले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्वच्छ आणि हरित उर्जा निर्मितीवर भर देत असल्यामुळे सर्वांची जबाबदारी वाढली आहे. पालकमंत्री कृती दलातून सर्वांना चांगले काम करायचे आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. तसेेच तांत्रिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असून, त्यांच्या प्रश्नावर 16 एप्रिल रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्याचे उर्जा राज्य मंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतक-यांची स्थिती बदलणार आहे. मुख्यमंत्री त्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण तांत्रिक कामगार ही भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही, तो उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यात गुंतवणूक वाढत असल्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन यांनी प्रास्ताविकातून विविध मागण्या मांडल्या. आमदार डॉ. राहुल पाटील, कुलगुरू डॉ. इंद्र मणि, अविनाश निंबाळकर, धनंजय औंढेकर यांच्यासह मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने ऊर्जा राज्य मंत्री पदी श्रीमती मेघना बोर्डीकर -साकोरे यांची वर्णी लागल्याबद्दल सत्कार व तांत्रिक कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी सय्यद जाहीरोद्दीन यांनी केले. सूत्रसंचालन सतीश कासेवाढ यांनी तर आभार प्रदर्शन बाबुराव तोटेवाढ यांनी केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






