श्रेया घोषाल (जन्म : १२, मार्च १९८४)
भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या अद्वितीय गायकीने अमीट छाप सोडणाऱ्या, स्वरांनी जग जिंकणाऱ्या श्रेया घोषाल चा आज वाढदिवस.
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सारख्या संपूर्ण जगभरात नाव कमावणाऱ्या गायिकांमध्ये श्रेया घोषाल चे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. लताजी, आशाजी नंतर भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्याचा मान श्रेयाने मिळवला आहे. लतादीदींच्या तोडीस तोड गाणे ही सोपी गोष्ट नाही, पण श्रेयाने आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ते शक्य करून दाखवले. तिच्या गायकीत शुद्धता, माधुर्य आणि उत्तम भावनाशीलता दिसून येते. मूळची बंगाली असतानाही श्रेयाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि अन्य भाषांमध्ये तितक्याच सहजतेने आणि दर्जेदारपणे गाणी गायली. आपल्या मराठीलाही श्रेयाने पोरकं ठेवलं नाही. मराठीत तिनी गायलेली गाणी एक वेगळा आनंद देऊन जातात. तिच्या दक्षिणात्य गाण्यांना जितकी लोकप्रियता मिळाली, तितकीच मराठी गाण्यांनाही रसिकांकडून मोठी दाद मिळाली. आज लाखो श्रोते तिच्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध होतात. केवळ गोड गळाच नव्हे, तर आपल्या गोड स्वभावानेही तिने रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्रेयाच्या गाण्याइतकीच तिच्या साधेपणाने भरलेली एक खास आठवण आमच्या मनात कोरली गेली आहे.
तिच्या गाण्यापेक्षाही मला तिच्या एका गोष्टीचा कौतुक वाटतं. ते म्हणजे तिच्या नम्रतेचा कारण एकदा ग्लॅमर आणि मोठेपणावर गेलेली व्यक्ती साधारणतः प्रसिद्धीच्या इतक्या झोतात असते की सर्वसामान्य माणसांना भेटणं , त्यांना भेटल्यानंतर चेहऱ्यावरती कृतज्ञता म्हणून हसू आणणं सुद्धा विसरून जाते. पण श्रेयाला भेटल्यानंतर हे मात्र तिळभरही जाणवत नाही. मी आणि माझी पत्नी विमानाने प्रवास करत असताना श्रेया ला भेटण्याचा योग आला. आम्ही दिल्लीला जात होतो. आम्ही समोरच्या सीट्स वरती बसलो होतो. त्यावेळी आम्ही बघितलं की आमच्या बाजूला श्रेया घोषाल बसली आहे. आम्हालाही खूप कौतुक वाटलं. आनंद वाटला एक सेलिब्रिटी गायिका आमच्या इतक्या जवळ चक्क बाजूला बसली आहे. आमच्या चेहऱ्यावर तिला पाहून जेवढा आनंद होता. तेवढाच आनंद तिच्याही चेहऱ्यावर दिसत होता. आम्ही तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं. तिन्ही तितक्याच प्रांजळपणे आमच्या हसण्याला दाद दिली. खरंतर मला मोठी माणसं फार जवळून बघायला मिळाली. त्यांच्या मानात श्रेयाचं वय खूप कमी होतं पण ती प्रसिद्धीच्या झोतात असूनही त्या क्षणी मात्र मला कुठेही तिच्यात गर्विष्ठ पणा, मोठेपणा, अहंकार नाही जाणवलं. त्यावर माझी बायको म्हणाली एवढी मोठी गायिका असून अगदी आपल्या मुलींसारखी वागते. तिचा नम्रपणा बघून आम्हाला तिच्या आई-वडिलांच्या संस्कारांचे ही फार कौतुक वाटलं. कारण आम्हाला एक घटना बघायला मिळाली. ज्या घटनेने आमच्या मनात श्रेयाच्या वागण्याची छाप उमटली. त्याच प्रवासात आमच्या समोर एका हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेताही बसला होता. अभिनयात तो श्रेष्ठ असला तरी, त्याच्या वागण्याने निराशा झाली. अनेक चाहते त्याला भेटण्यासाठी उत्सुक होते, पण त्याने कोणालाही जवळ फिरकू दिले नाही. फोटोसाठी विनंती करणाऱ्या चाहत्यांना त्याने सरळ झिडकारले. असो पण याविषयी कमीच बोललेलं बरं. पण त्या सगळ्यात आम्हाला एक मात्र जाणवलं. त्या क्षणी खरी मोठी माणसं कोण, हे प्रकर्षाने जाणवलं. श्रेया घोषाल ची प्रसिद्धी काही कमी नाही, पण तिच्या वागण्यात कधीच अहंकार जाणवत नाही. त्यांच्या साधेपणामुळेच त्या रसिकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवू शकल्या आहेत.
श्रेयाची विनम्रता आणि सहजता पाहून आम्हाला तिच्याबद्दल आणखी आदर वाटू लागला. मोठेपणा आल्यावर तो टिकवणं अवघड असतं, पण श्रेयात प्रसिद्धीचा किंचितही गर्व जाणवत नाही. तिचा हेच नम्र वागणं तिला इतरांपेक्षा वेगळा बनवत. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आज शुभेच्छा देताना. फक्त एवढा वाटतं की तिने आयुष्यभर असंच नम्र राहावं. असंच सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनावर आपल्या सुरांनी अधिराज गाजवावं. भारतीय संगीताची पताका फडकत ठेवावी. ती जशी आता चढत्या क्रमाने पुढे जात आहे तशीच ती कायम जात राहो. प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम करावं याच तिला शुभेच्छा!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!